Saturday, August 24, 2013

विस्मृती स्मृतींची झाली..!!

काळ बदलला की कायदा बदलतो..
जिथे तो किती पाळायचा व कसा टाळायचा हे ठरविणारे लोक जिवंत असतात तिथे कायादेग्रंथ गौण ठरतात.
     पण तरीही काही कायदेपंडीतांनी असे ग्रंथ पूर्वाग्रहादूषितपणामुळे जाळले.त्यांचे अनुयायीही त्यांचेच अनुकरण करीत मनुस्मृतीची होळी करून स्वतःची पोळी भाजून घेवू लागले आहेत,याचे एकमेव कारण इतकेच की आम्हाला नको तिथे श्रुतिस्मृतींचा विसर पडतो अन् नको तेंव्हा पुळका येतो..!!

आचार जाहले भ्रष्ट
सद्विचार झाले नष्ट
तत्कारण आहे स्पष्ट
द्वेषाने पेटून श्रुतीस्मृतींची राखरांगुळी केली
विस्मृती स्मृतींची झाली !!१!!

संपले जेथ अज्ञान
वाढले ज्ञान विज्ञान
होवून तेथ बेभान
पेटल्या खेटल्या द्वेषाग्नीच्या विद्रोहास  मशाली
विस्मृती स्मृतींची झाली !!२!!

ग्रंथावर घालू बंदी
देवून घोषणा मिंधी
मंत्र्यांची होते चांदी
सरकारी थारोळ्यात स्मृतींचा कुणी न उरला वाली
विस्मृती स्मृतींची झाली !!३!!


ग्रंथप्रमाण्याचीही
कोणावर सक्ती नाही
रानटी पशूंनी काही
कोळसे जुने घोटून स्मृतींची यथेच्छ निंदा केली
विस्मृती स्मृतींची झाली !!४!!

फायदे स्मृतीग्रंथांचे
लाखो वर्षांपूवीचे
जे दुरुस्त केले त्यांचे
देवून दाखले बोलायाची योग्य वेळ ही आली
विस्मृती स्मृतींची झाली !!५!!

याज्ञावाल्क्य”- “प्राजापत्य”
वाचा ऐसे स्मृतिग्रंथ
स्मृत्यर्थ दावितो सत्य
कायदादुरुस्ती मनुस्मृतीची तिथेच केली गेली
विस्मृती स्मृतींची झाली !!६!!



स्त्रीवर्गा शिक्षण द्यावे
हे सूत्र स्मृतींनी गावे
सिद्धांत तसे मांडावे
पराशरस्मृतीची ठाम भूमिका होताना बलशाली
विस्मृती स्मृतींची झाली !!७!!

सिद्धांत असे कित्येक
मांडले स्मृतींनी नेक
परि होते डोळेझाक
परकीयांचे सिद्धांत आम्हाला प्यारे सांप्रतकाळी
विस्मृती स्मृतींची झाली !!८!!

कायदेग्रंथ विश्वाचे
 विश्वाच्या विश्वासाचे
 विश्वासाच्या श्वासांचे
ज्या श्वासांचे दुर्दैव रेखिले ब्र्हम्ण्याच्या भाली
विस्मृती स्मृतींची झाली !!९!!

____________






No comments:

Post a Comment